नवनवीन उद्भवणा-या समस्या,रोग,आजार यावर उपाय शोधत कार्यरत राहणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच-डाॕ.सदानंद राऊत
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला.
धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होम व जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष व सर्पतज्ञ डॉ.सदानंद राऊत,संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने ऑनलाईन मार्गदर्शन करताना डॉ.सदानंद राऊत म्हणाले की,मेडिकल क्षेत्रात एक फार्मासिस्ट म्हणून डिप्लोमा किंवा पदवी मिळवलेल्या प्रत्येकाचीच फार महत्वाची भूमिका असते.कुठले औषध कशावर घ्यायचे व किती प्रमाणात घ्यायचे त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट काय असतील याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.औषधे,गोळ्या,प्रिस्क्रिप्शन,औषधासंदर्भात समुपदेशन,आजाराविषयी मनमोकळी सल्लामसलत,रक्तदाब,रक्तशर्करा यांचे प्रमाण तसेच चुकीच्या औषधामुळे किंवा डॉक्टर,फार्मासिस्ट यांना न विचारता घेतलेल्या गोळ्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले.वेगवेगळ्या आजारापासून कसे वाचता येईल त्याची लक्षणे कशी ओळखायची त्याचप्रमाणे गोळ्या औषधांची वैधता संपल्यानंतर वापरात आणू नये इत्यादी विषयी माहिती दिली.
जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न व ते सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे याचा विचार विद्यार्थीदशेत असतानाच करणे अत्यंत महत्वाचे आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणजे फार्मासिस्ट.फार्मसिस्ट हा एक रुग्णाभिमुख व्यावसायिक असून योग्य ते मार्गदर्शन करणे ही त्याची जबाबदारी आहे.औषध व्यवसाय हा सुनियंत्रित आहे, जबाबदारीचा आहे, यातील चुका म्हणजे रुग्णाच्या जिवाशीच खेळ आहे.या व्यवसायाचा केंद्रबिंदू औषधे नसून रुग्ण आहे.शिक्षणाचा दर्जा, काळानुरूप अभ्यासक्रम, त्यात रुग्णाभिमुख दृष्टिकोन येणे आवश्यक आहे.
औषधनिर्माणशास्त्र हे क्षेत्र फार व्यापक असून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संशोधनाच्या भरपूर संधी आहेत.संशोधन करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.ज्या विषयावर कुठलेच संशोधन आत्तापर्यंत झालेले नाही त्यावर तुम्ही काम करा.त्यात खूप वाव आहे.नवनवीन उद्भवणाऱ्या समस्या,रोग,आजार व त्यावरचे उपाय शोधण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून सतत कार्यरत राहणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच आहे असे यावेळी डॉ.राऊत म्हणाले.
फार्मासिस्ट डे च्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर,प्रास्ताविक डॉ.सुभाष कुंभार यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.
Comments
Post a Comment